Monday, June 2, 2014

पुण्यातल्या बाजीरावच्या रोडवरच्या टेलिफोन एक्सचेंजच्या अगदी समोरच अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल चौकातली ही मेहेंदळे बिल्डिंग.रस्त्याच्या मधोमध.अक्षरं उंच ठिकाणी,समोरनं फोटो काढायचा झाला तर टेलिफोन एक्सचेंजच्या दुसर्या मजल्यावर जाऊन किमान 10 एक्सची झूम लेन्स तरी वापरावी लागेल. सध्याचा फोटो अगदी कामचलाऊ, एन्ट्री लेव्हलचा कॅमेरा हातात होता, त्यानंच काढलाय.. पुन्हा नीट काढणार आहे. (अशा जुन्या इमारतींचे फोटो लवकर लवकर काढून ठेवावेत असा हा काळ!!)

अक्षरांभोवती खचाखच नक्षीकाम. ॐ, रेघा, चौकटी, गोलाकार, खालूनवरून किरण वगैरे! अक्षरांचं वळणसुद्धा फार ग्रेट नाही. तसं त्या काळी पाॅप्युलर असलेल्या स्टाईलचंच.विशेष कलात्मक असं खास काही नाही. उलट एकूण सगळा मामला जरासा बटबटीत वाटावा, असाच; पण लक्षवेधी.

मला विशेष मह्त्वाचं वाटलं ते म्हणजे, मेहेंदळे ह्या बिल्डिंगच्या मालकांनी आपल्या बिल्डिंगच्या अगदी दर्शनी भागात, स्वतःच्या नावानंतर लगेच ठळकपणे दिसेल अशी बिल्डिंगच्या काॅण्ट्रॅक्टर्सची नावं कोरून घेतली आहेत. 75/ 80 वर्षांपूर्वी लहान/मध्यम आकारांच्या इमारती बांधायच्या असतील, तर आर्किटेक्टचं बरचसं काम काॅण्ट्रॅक्टर्सच करत.
(अपवाद :मोठमोठे वाडे,मोठ्या शाळा,'संस्था, व्यावसायिक इमारती, हाॅस्पिटल्स इत्यादी) आर्किटेक्ट,इंजिनीयर, स्ट्रक्चरल इंजीनियर, ह्या गोष्टी साध्यासाध्या बांधकामांसाठी विशेष महत्वाच्या झाल्या तो काळ थोडा नंतर. पालिकांचे, महानगरपालिकांचे नियमही पुढे बदलले.
तोपर्यंत इमारतीचं सौंदर्य, उपयुक्तता, स्ट्रक्चरल डिझाईन, इतर स्पेसिफिकेशन्स, वैशिष्टयपूर्णता, बळकटपणा ह्या सगळ्याचीच जबाबदारी बर्याच वेळा काॅन्ट्रॅक्टर मंडळीच खांद्यावर घेत. इमारतीचा पाया खणण्यापासून ते उभारणी झाल्यानंतर रंगसफेदी करून डायरेक्ट वास्तुशांतीचं जेवण करून सुपारी चघळत आणि पानबीन खाऊन मगच बाहेर पडणार हे लोक! घरच्या, घरातल्या, घराच्या सगळ्याच कामांत त्यांचा महत्त्वाचा वाटा, मग त्यांचं नाव ठळक दिसेल असं का नको?

मेहेंदळ्यांच्या ह्या बिल्डिंगचे काॅन्ट्रॅक्टर्स आहेत : श्री. प. काणे आणि न. बा. फडके

.

No comments: